समोर आलेल्या रुग्णाशी कसं बोलायच कसं वागायचं कसं तपासायच वगैरे वगैरे ट्रेनिंग मेडिकलच्या पहिलीपासूनच सुरु होतं. समोरचा माणूस कितीही वैतागलेला असला, प्रश्न शंका कुशंका वगैरे वगैरे विचारात असला तरी शांत डोक्याने त्याला कसा प्रतिसाद द्यायचा आणि कस समजवायचं हे सगळ शिकत आणि बघतच कोणीही पुढे जात असतो. “अत्यंत आज्ञाधारक” या category मध्ये मोडत असल्याने या सगळ्याच गोष्टीचं भान ठेवण्याचा , पालन करण्याचा वगरे माझा पण पूर्ण प्रयत्न असतोच!! पण काल परवाचा एक प्रसंग मात्र माझ्या संयमाची अग्निपरीक्षा पाहणारा ठरला. झालं असं की परवा औषध घ्यायला म्हणून पहिल्याच नंबर ला एक साधारण सत्तरीच्या आसपासचे गृहस्थ माझ्यासमोर आले. पान का सुपारी असलं काहीतरी तोंडात ठेवून (कुणी रुग्ण म्हणून काय पण असलं काहीतरी चघळत इतर वेळीही समोर आलं तरी माझी चिडचिडच होते). पण तरी पहिल्या नियमाला अनुसरून मी हसून त्यांची तपासणी सुरु केली. खरतर मी काही सांगायच्या किंवा विचारायच्या आतच त्या माणसानी आपल्या एका मागोमाग एक ५-६ तक्रारी काय, त्यावरचे उपाय काय त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत आणि त्यावर ते कसे घरगुती ऐकीव उपचार करतात आणि या सगळ्याने कसा कसा फायदा होतोय हे सगळं एका दमात सांगून टाकलं. सांगायला हरकत काहीच नाही, पण तसं करतानाचा आविर्भाव मात्र ‘मला-जे-वाटतय-तेच-मला-झालय. तसच-होतंय-आणि-याहून-वेगळं-काही-असूच-शकत-नाही’ अशाप्रकारचा होता ! मी आपल हे सगळं ऐकतच असताना अचानक माझीच उलटतपासणी सुरु झाली.

काका : हं मग डायग्नोसिस काय तुमचं ??

मी (दचकून): कसय काका..तुम्ही तुम्हाला काय वाटतंय ते सांगितलत पण तुमच्या नुसत्या सांगण्यावरून नाही ना ठरवू शकत निदान. मला आधी तपासावं लागेल मग सांगेन काय निदान होतंय ते..

काका : पण मी सांगतोय नं.. बाकी मला काही होत नाही..(पुन्हा त्याच तक्रारी सुनवून).. हे अस आहे..आता काय ते डायग्नोसिस करा न द्या औषध..

मी: बघुयात.. अजून काही त्रास??

काका: नाही अजून काही नाही,..रोज सकाळी प्राणायाम करतो..””अर्धा”” तास कपालभाती भस्रीका करतो..

मी: इतर काही त्रास नाही??

काका: काही नाही.. अनुलोम विलोम करतो रोज..म्हणून बरय…नाहीतर थोडा असा कफाचा त्रास होतो..कफ अडकतो घशात…पण जोरात (नाक शिंकरल्यासारखा अनुलोम विलोम करून दाखवत) केलं की मग काहीतरी बाहेर पडत मग बर वाटत एकदम..

मी: (भीतीयुक्त आश्चर्याने) पण अहो प्राणायाम हा असा करायचा नसतो हो..

काका : काही नाही बरोबरे.. ते सांगतात ना गुरुxxx… बर वाटत तसा केला की…काहीतरी बाहेर पडत..मग आराम मिळतो..

मी: अहो पण मग.. त्याला किमान प्राणायामाच नाव तरी देऊ नका.. श्वासाच्या कवायती वगरे असा काही तरी म्हणा हवं तर..

काका: असं कसं..प्राणायाम च करतो मी..मी पाहिलंय ते..ते guruxxx सांगतात ना tv वर..ते बघूनच करतो आम्ही..

मी: (tv वर बघून.. हे ऐकूनच मला कल्पना आली आणि अशाच प्रकाराने कळत-नकळत अ’योग’मार्गाला लागणार्या असंख्य भावीकांच्यामार्फत भगवान पतंजलींची मनोमन माफी मागून मी पुढची चौकशी चालू केली)असो.. बाकी काय दिनक्रम असतो तुमचा??

काका: काही नाही (हे प्रत्येक वाक्याच्या सुरवातीला आलच पाहिजे)..सकाळी उठतो ६ ला..अंघोळ, पूजा करतो…मग प्राणायाम करतो..मग बाहेर फिरायला जातो..

मी: व्यायाम होतो का काही??

काका: हो.. करतो.. ते..( हाताच्या कवायतीचे २-३ प्रकार करत)..हे अस करतो रोज..

मी: थोडा फार घाम येईल असा काही व्यायाम होतो का?

काका: प्राणायाम होतोच की….मग बाहेर जातो फिरायला..

(घाम येईपर्यंत प्राणायाम या संकल्पनेनेच खर तर घाम फुटला मला)

मी: प्राणायाम हा व्यायाम नाही हो काका..

काका: ते सांगतात ना..सांगितलाय त्यांनी…तसाच करतो मी (त्यांची काही चूक होतीये हे अमान्य करत)

मी: मुळात म्हणजे तुमचा हे सगळ करायचा क्रम चुकतोय… त्यात पोटाच्या असंख्य कुरबुरी असताना तुम्ही जोरजोरात अर्धा अर्धा तास कपालभाती, भस्रिका करताय.. नाक शिंकरल्याप्रमाणे अनुलोम विलोम करताय. हे सगळ कोणताही व्यायाम/ हालचाल नसताना आणि तेही आंघोळ वगरे उरकल्यावर??.. वेळ मिळेल तसं आणि तेव्हा???..

काका: नाही नाही.. त्या गुरुंनी सांगितलाय तसाच करतो मी..ते बरोबरे तसच..

मी: अहो काका..यातल्या बर्याचश्या गोष्टी सध्याच्या तुमच्या तब्येतीच्या तक्रारी बघता तुम्हाला चालणार्या नाहीत…त्यात त्यांचा ‘क्रम’ चुकीचा..करण्याची पध्दत पण चुक्तीये. खर तर एवढाच बदल केला तरी औषधाशिवाय बरे व्हाल..गोळ्यांची आवश्यकताच वाटत नाही.

काका: ते राहू दे..मला माहितीये..बरोबरे ते..

मी: हे बघा…माझा सल्ला जर ऐकायाचाच नसेल आणि वरून तुमचच सांगण मी ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल तर माफ करा पण मी औषध देऊ शकणार नाही…धन्यवाद!

काका: (गुरुंचा अनादर वर्मी लागला काकांच्या.. मी तसा केला नसतानाही) ते असू द्या हो..तुम्ही औषध लिहून द्या..

विषय वाढवायचा नाही, औषधाशिवाय हे जाणार नाहीत आणि पुढच्या रुग्णांची गैरसोय नको म्हणून एक अत्यंत बेसिक औषध लिहून देऊन मी (कोपरापासून ) नमस्कार केला त्याना आणि म्हणल या आता..वाटलं आता तरी जातील.. पण गम्मत पुढे आली

चिडलेले काका उर्फ अंधभक्त : डिग्री काय तुमची? काय क्वालिफिकेशन काय?

मी: काय कारण विचारायचं?

काका: नाही..सांगा की…इथे लिहून द्या खाली…

मी: कारण तर सांगा..

काका: बर असतं माहीत असलेल…

मी: सांगायचच झालं तर आत्ता दिलेल्या सल्ल्यासाठी मी over qualified आहे..कारण ज्या चुका दाखवल्यामुळे तुम्हाला माझ्या पात्रतेची चौकशी कारायची इच्छा झाली त्यासंबंधित गोष्टींचा अभ्यास आमच्या अभ्यासक्रमात पहिल्या आणि दुसर्या वर्षातच होतो..त्यावर अजून ५-६ वर्ष तरी माझ शिक्षण झालंय..तेही recognized university मधून.. पण खरतर काका हा प्रश्न योगाशास्त्राच्या नियमाना फाट्यावर मारून चुकीच्या पद्धतीने प्राणायाम करू देणार्या तुमच्या त्या गुरु का बाबाना का नाही विचारलात हो कधी?? एवढ सगळ (तुमच्या मताप्रमाणे) बरोबर पद्धतीने होत असूनही तब्येतीच्या किमान ५-६ तक्रारी अजून आहेतच ना तुम्हाला?? मग काय फायदा या असल्या विचित्र कवायातीचा?? जाब खरा तर त्याना विचारायला हवा तुम्ही..

यावर काहीच उत्तर नसल्याने सारवासारव करत “बघून घेईन” या अविर्भावात “येतो ७ दिवसांनी”..” फरक पडतोय का औषधाने दाखवायला” म्हणत त्यांनी काढता पाय घेतला..पण माझ्या डोक्यात मात्र काही जुनेच विचार पुन्हा नव्याने घर करून राहिलेत..

गुरु परंपरेला पूर्वीपासून आपल्या देशात मानाचं स्थान आहे. एवढच काय अजूनही इतर देशांमध्ये आपली साधू आणि बाबाजी राहणारा देश अशी ओळख आढळते. साहजिकच भक्तांची संख्यादेखील इथे कमी नाही. एक काळ असा होता की काही शिकायचं म्हणलं की त्या त्या शास्त्रामध्ये पारंगत ऋषी गुरु अशा व्यक्तीकडूनच ते शिकाव लागे. मग ती धनुर्विद्या (Archery) असो का अध्यात्म (spirituality). पण कलीयुगामध्ये जशी वस्तूची नाही तशी स्वघोषित बाबा, साधू, गुरु यांची पण खात्री देता येत नाही हे कित्येकाना का समजत नाही अजूनही?? दुर्दैवाने शरीर आणि मनाच्या आजारात पिचलेले असंख्य लोक अशांच्या अशास्त्रीय सल्ल्यांना लवकर बळी पडतात आणि केवळ काही विशिष्ट रंगाचे कपडे घातले आणि अध्यात्म-योग-आयुर्वेद संदर्भातल्या ४-५ वरवरच्या गोष्टी बोलल्या म्हणून कोणाही व्यक्तीला अगदी साष्टांग नमस्कार घालायलाही काही लोक मागेपुढे पाहत नाहीत. या देशात, आयुर्वेदातले चरक सुश्रुत असोत की atom चा शोध सर्वप्रथम लावणारे कणाद ह्यांना ‘ऋषी’ च म्हणलं जातं. स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगेबाबा देखील ‘बाबा’ किंवा ‘महाराज’ म्हणून प्रसिद्ध. विवेकानंद हे ‘स्वामी’ तर समर्थ रामदास हे ‘गुरु’ म्हणून पूजनीय. पण म्हणून ‘बाबा’,‘महाराज’, ‘गुरु’, किंवा ‘स्वामी’ म्हणून आजच्या काळात ज्यांचा उल्लेख होतो ते सगळेच्या सगळेच त्या एका बिरुदावालीमुळे तेव्हढेच पूजनीय ठरतात का??? इतर कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलू शकतात का ? वर सांगितलेल्या पैकी ज्यां गुरुतुल्य पूजनीय व्यक्ती त्यांनी कधी केवळ प्रसिद्धी साठी सरसकट विधानं केली नसावीत. प्रबोधन का awareness निर्माण करताय तोपर्यंत ठीके पण त्याचा अयोग्य पद्धतीने प्रसार होत असेल तर काय उपयोग?? वर अजून एखाद्याला दुरुस्त करायला जावं तर उलटच होवून बसायला लागलय. श्रद्धा असावी पण ती जर सुशिक्षित लोकांमध्येही अंधश्रद्धेमध्ये परिवर्तित होत असेल तर त्याना जागं करायची गरज आपल्याला नक्कीच वाटायला पाहिजे. त्यामुळे चूक खरतर फक्त सांगणार्याची नसून ते न तपासून घेता आपण जे करतोय ते योग्य प्रकारे करतोय की नाही याची खातराजमा करून न घेता सरसकट surrender होणार्यांची बहुदा त्याहून जास्त आहे. सांगणारे येतील जातील आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल न येईल. पण किमान ते वापरणारे भक्त का काय आपल्याला अवतीभवती असतील तर त्यांना याची जाणीव करून देणं तुमच्या आमच्या हातात आहे. माझ्या friend list मधल्या लोकांचं average वय बघता आंधळेपणाने या प्रकारांना बळी पडणारे लोक तसे कमीच असणारेत पण तुमच्या आजूबाजूला हे असलं काही दिसलं तर एक दोन मिनिट वेळ काढून त्या भक्ताच ध्यान मोडुन त्याला सांगा की “बाबा रे, एकदा जे करतोयस ते बरोबर आहे ना याची तद्न्य व्यक्तीकडून खात्री करून घे, हे तुला चालणारे का याची चौकशी तरी करून घे, मग खुशाल लढ”. काळा पैसा निघाला तशी काळी practice पण बाहेर पडली तर खरे अच्छे दिन यायचे. नाहीतर भक्तजनहो आनंद आहे !!

~वैद्य देवश्री बुझरूक
devashree@swasthyam.co.in

Image Credits: Pixabay | Alexas_Fotos