रखरखत्या उन्हाळ्यात सांभाळा प्रकृती!

आता काही दिवसातच उन्हाचा कडकपणा अजून वाढेल.बाहेर जायला ही नकोसे होईल, पण त्याबरोबरच मस्त रसाळ फळांचा सिझन सुरू होईल.वेगवेगळी फळे, त्यांचे रस, सरबते, साधे माठातले पाणी ह्याचा वापर करून उन्हाळ्याचा कोरडेपणा दूर ठेवायला आपण प्रयत्न करतो.उन्हाळ्यात सगळ्यात जास्त जाणवतो तो आतून आलेला कोरडेपणा.घामामुळे त्वचा ओली होऊ शकते, पण आतला कोरडेपणा घालवण्यासाठी काही आहार विहारातले बदल केल्यास कोरडेपणा आटोक्यात राहायला मदत होऊ शकते. पहिले ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की उन्हाळा म्हणजे पित्त वाढण्याची शक्यता असते, तसेच वातही वाढायला सुरुवात होते.ह्यामध्ये सगळ्यात आवडती गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे दिवसा झोपणे.प्रकृतीपूर्ण अशा सर्वांनीच उन्हाळ्यात दिवसा डुलकी काढल्यास शरीरातील कोरडेपणा दूर व्हायला मदत होते. शरीरात स्निग्धता वाढवायला दूध, तूप, चक्का हे प्रमाणात अवश्य खावे.खूप वातप्रकृती वाले, किडकिडीत लोकांनी मसाला दूध पिऊन दिवसा झोपावे .घरी केलेले आईस क्रीम खायला हरकत नाही, बाहेरून दूध आणि साखरेपासूनच बनवलेले आईस क्रीम मिळत असेल तर दिवसा अवश्य खावे.आंबट रसाची फळे, सरबते प्यावीत.आंबट गोड सरबते रुची वाढवतात, भूक वाढवतात, अग्नी प्रदीप्त करतात.श्रीखंड, फळांचे रस घालून केलेले शिरा, जॅम असे पदार्थ करावेत.जेवणात गोड आणि पातळ पदार्थ जास्त असावेत.आंब्याचा रस, जांभूळ, द्राक्षे,कलिंगड ही फळे खावीत.पाणी माठातले प्यावे,त्याने तहान आटोक्यात राहायला मदत होते.दही, ताक थंड असले तरी गुणाने उष्ण आहेत, पातळ ताक जिरे पावडर घालून प्यावे.दही पित्तकर असते,खायचेच झाल्यास साखर घालून कधीतरी खायला हरकत नाही. माठामध्ये वाळा अवश्य टाकावा.हलक्या हाताने खोबरेलाने अंगाला मसाज करावा.ज्यांना नाकाचा घुळणा फुटण्याची सवय आहे त्यांनी शतावरी कल्प, दूर्वा कल्प 1-1 चमचा दुधामधून घ्यावा.पोट साफ राहील ह्याकडे लक्ष ठेवावे.पांढऱ्या कांद्याचा वापर जेवणात अवश्य करावा. हलका व्यायाम करावा (साधारण दिवसाला 20 मिनिटे). आयुर्वेदामध्ये सरबताला ‘पानक’ अशी संज्ञा आहे.खाली काही सोप्या पण उपयोगी अशा पानकांच्या कृती देत आहे:

द्राक्षा पानक: मनुका ½ वाटी, 8 वाट्या पाणी उकळवून अर्धे उरवणे.कुस्करून, गाळून काचेच्या बरणीमधे ठेवून देणे.हवे तेव्हा वरील मिश्रण+1 चमचा साखर, मिरे चूर्ण चिमूटभर, आल्याचा रस पाव चमचा, दालचिनी आणि चिमूटभर भीमसेनी कपूर(शुद्ध असेल तरच, नाहीतर टाळावा), आणि पाणी घालून देणे. हे सरबत उलटी, मळमळ, चक्कर, थकवा, तहान दूर करते.

धान्य पानक: धन्याचे चूर्ण1/4 वाटी आणि पाणी 4 वाटी उकळून 2 वाट्या उरवणे.हा अर्क, बडीशेप पावडर आणि साखर घालून द्यावे.ज्यांना उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ किंवा कमी प्रमाणात होत असल्यास फायदा होतो.हे सरबत अतिशय थंड, पित्तशमन करणारे आणि मूत्रासंबंधी त्रास कमी करणारे आहे.

पिकलेल्या आंब्याचे पानक: वरीलप्रमाणेच पिकलेल्या आंब्याचा रस व पाणी एकत्र उकळून ठेऊन देणे.हवे तेव्हा चवीनुसार थोडी साखर, मिरे पावडर, दालचिनी वेलची, तमालपत्र पावडर घालून देणे.हे सरबत पचायला थोडे जड आणि उष्ण असते.परंतु अत्यंत रुचिकर, बळ देणारे आणि शरीरातील वात आणि कोरडेपणा कमी करते.
कैरीचे सरबत किंवा ज्याला आपण पन्हे म्हणतो ते किंचित पित्त वाढवणारे असते, म्हणून त्यामध्ये योग्य प्रमाणात साखर आणि वेलची, दालचिनी घालून द्यावे.

लिंबू पानक: 1 ग्लास सरबताला अर्ध्या लिंबाचा रस , साखर 3 ते 4 चमचे(लिंबू आंबट असल्याने जास्त साखर लागते), लवंग, मिरे पावडर एकत्र 1 ग्लास पाण्यात ढवळावी.हे सरबत वात कमी करते, अग्नी वाढवते आणि कुठल्याही प्रकारचे खाणे पचवायला मदत करते.
अशाच पद्धतीने जांभूळ, आवळा, चिंच, द्राक्षे, ह्यांचीही पानक मिश्रणे तयार करून ठेवता येतील.

संदर्भ: योगरत्नाकर