डिसेम्बर ते मार्च म्हटले की खाण्यामध्ये तेलबिया, जास्त उष्मांक असलेले पदार्थ हे जास्त वापरले जातात.पौष्टिक लाडू, सुकामेवा, चिक्की, तिळाची वडी, वेगवेगळ्या चटण्या ह्यांच्या साहाय्याने शरीरातील उष्णता टिकून राहावी ह्यासाठी प्रयत्न केला जातो.जास्त करून तिळाचा वापर ह्या ऋतूत केला जातो.सणांमध्ये सुद्धा संक्रांत, भोगी, होळी सारखे सण असतात ज्या दिवशी तिळाचे, गुळाचे पदार्थ खाल्ले जातात.

बाजारात तीळ हे गावरान, काळे आणि पॉलिश केलेले असे 3 प्रकारचे मिळतात.गावरान वापरणे केव्हाही चांगले करण त्यामध्ये त्याचा वरचा थर काढून टाकला जात नाही.तीळ हे केसांच्या वाढीला, त्वचेच्या तजेल्यासाठी उपयोगी असतात.तिळाचा भुसा मात्र मलबद्धता वाढवणारा आहे.

तीळाचे तेल हे वेगळ्याच रीतीने काम करते.त्वचेसाठी, सांध्यांसाठी अत्यंत उपयोगी.पोटातून तीळ तेल घेणे मात्र त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फारसे हितकर नसते.औषधे टाकून सिद्ध केले असता औषधांच्या गुणाप्रमाणे त्या तेलाचे अजून वेगवेगळे फायदे दिसतात.आयुर्वेदिक बऱ्याच औषधी तेलांमध्ये बेस हा तीळ तेलाचा असतो.तीळ चावून चावून खाल्ले असता ते दातांची मजबूती वाढवतात.

तीळ हे शक्यतो कुठल्यातरी पदार्थांबरोबर खाल्ले जातात.बाजरी भाकरीला तीळ लावून, पुऱ्या, पराठा, चिवडा, लाडू, कटलेट ह्यात पण तिळाचा वापर करता येईल.रोजच्या आहारातही तिळाची, तीळकढीपत्त्याची चटणी वापरू शकतो.बाळंतिणीला तीळ, बडीशेप, बालंतशेप आणि सुके खोबरे एकत्र भाजून मुखवास म्हणून दिल्यास दूध येण्यासाठी आणि बाळाच्या जन्मानंतर होणारा वात कमी व्हायला मदत होते. रोजच्या अभ्यंगासाठी तीळ तेल सर्वात चांगले. तिळाच्या तेलाने साधारण आठवडाभर गंडूष किंवा गुळण्या केल्या असता दातांची सळसळ कमी व्हायला मदत होते आणि हिरड्यांना ही बळकटी मिळते.अशी ह्या मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा तिळाची गाथा सुफळ संपूर्ण.